हा अनुभव वाचल्यावर काय बोलू तेच कळत नाहीये.

नमस्कार मित्रांनो,

गेले वर्षभराहून अधिक काळ मी घरी आहे आणि वर्क फ्रॉम होम करतोय. यापूर्वीही मी वर्क फ्रॉम होम केले होते पण त्यावेळी मी अगदी काही दिवस… आठवडे घरी असायचो पण या काही दिवसांमध्ये माझे आणि माझ्या वडिलांचे बर्‍याचदा किंबहुना दररोज खटके उडायचे. पण गेले एक वर्ष मी खूप जास्त सुखाने घरी राहतोय आणि आमच्यामधले खटके हे खटके नसून विसंवाद होता हे कळले मला. बर मला हे शहाणपण आले कुठून? तर या मागे एक अनुभव आहे, छोटासा आहे पण आहे !

मित्रांनो साधारणपणे दोन वर्षाचीपूर्वीची गोष्ट आहे, साडेपाच च्या आसपास माझे ऑफिस सुटले आणि तेव्हड्यात मला माझ्या मित्राचा फोन आला. म्हणाला देव्या मला थोडीशी खरेदी करायची आहे तर तू डेक्कनला थांब मग तिथून पुढे आपण जाऊ. मी डेक्कन कॉर्नर ला पोचलो आणि अजून मुकेश आला नसल्यामुळे चहाच्या एका गाडीवर मी चहा पित थांबलो होतो.

मी मुकेशची वाट पाहत होतो तेव्हाढ्यात साधारणपणे वयाची पासष्टी उलटलेले एक गृहस्थ, गळ्याभोवती लेस गुंडललेला डोळ्यावर चष्मा, थोडे मळकटलेला सदरा आणि पायजमा. त्यांनी माझ्याकडे पहिले आणि का कुणास ठाऊक इतका वेळ शांत असलेले बाबा मला म्हणाले, लेकरा एक वडापाव घेऊन दिलास तर खूप बर होईल रे.

माणसाला सहसा लाचार माणूस आणि स्वाभिमानी माणूस यातला फरक लगेच कळतो. हा म्हातारा लाचार नवता आणि भिकारी तर मुळीच नवता, उच्चारलेला प्रत्येक शब्द हा अंतकरनापासून आणि केवळ नाईलाज म्हणून येत होता. मला खूप अवघडलेल्या सारखे झाले आणि मी बाबांना म्हणालो, बाबा हे घ्या शंभर रुपये आणि तुम्हाला हवे ते घ्या. त्यावर ते बाबा म्हणाले, पैसे नको फक्त एखादा वडापाव घेऊन दे.

मी वडापाव आणला आणि त्यांना दिला तर हे म्हणाले की, तुला वेळ असेल तर शेजारी बस… सोबतीला कुणी असेल तर घास गोड लागतो रे. तू शेजारी असलास की मला माझा मुलगाच मला सापडला असे काहीवेळ तरी वाटेल. मी शेजारी बसलो, बाबांची थोडी चौकशी केली. कुठून आले ? कुठे जाणार ? वगैरे वगैरे.

मी नांदेड मधून आलो आहे, तिथल्या कंधार तालुक्यातल्या एका छोट्या खेडेगावात राहतो. आमचा एकुलता एक मुलगा इथे पुण्यात मोठ्या कंपनीत एंजिनियर आहे. तिनेक वर्षापूर्वी त्याने त्याच्याच कंपनीमधल्या एका मुलीशी लग्न केले. तिला आम्ही गांवढळ वाटतो. माझा लेक चांगला आहे पण त्यालाही तिचेच पटते. परवा त्याचा माझ्या फोनवर फोन आला होता, फोनवर संगत होता, अमेरिकेत नोकरी मिळालीय, आणि पुढचे दहा वर्षे आता तो तिकडेच जाणार आहे.

इथे होता तेव्हा वर्षकाठी यायचा कधीतरी भेटायला, पण आता इतक्या लांब जाणार आहे. त्याला म्हणालो इतक्या लांब चाललास, एकदा भेटून तरी जा. पण लेकराला लई काम होती, आणि इतक्या लांब येणे परवडायच नाही म्हणाला. आता तूच सांग पुढचे दहा वर्षे आम्ही जगतोय की नाही कोण जाणे… तेव्हा त्याच्या आईने चांगले बेसनाचे लाडू रातभर जागून बनवले आणि मी दुसर्‍या दिवशी सकाळीच निघालो.

‘मी विमानतळ शोधतोय, पण मला सगळे सांगताएत की डेक्कन ला विमानतळ च नाहीये’ मी पण म्हणालो बाबा, विमानतळ तिकडे लांब विमाननगरला आहे डेक्कनला नाही. आजोबांनी खिशातून एक व्यवस्थित जपलेला कागद काढला आणि माझ्यापुढे धरला आणि म्हणाले त्याला मी म्हणालो की तुला नाही जमत तर मीच येतोय तेव्हा त्याने तर हाच पत्ता दिला होता. आणि या फोनला देखील काय झालाय काय माहिती, पोराचा फोन येतबी नाही आण लागत बी नाय.

मी त्यांच्या कॉल हिस्टरी मध्ये गेलो आणि मुलाला फोन लावला, पण एक रिंग जाऊन फोन लगेच कट व्हायचा बहुतेक त्याने नंबर ब्लॉक केलेला होता. मग मी बाबांच्या हातातला कागद घेऊन पाहिला, त्यावर लिहले होते… पुणे अंतराष्ट्रीय विमानतळ, गुडलक हॉटेल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे.

मला सगळी गोष्ट लक्षात आली त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि त्याला त्यांना भेटायचे देखील नवते म्हणून त्यांचा फोनही घेत नवता. मला कळून चुकले ज्या विमानाने त्यांचा मुलगा जाणार आहे ते आयुष्यात पुन्हा कधी त्याच्या वडिलांच्या दिशेने येणार नव्हते.

तेव्हाढ्यात मुकेश आला, मी त्याला फक्त दोन मिनिटे थांब अशी खून करत तिथेच बाबांच्या शेजारी बसलो. मी सुन्न झालो होतो, आजोबांना खरच आपला मुलगा कळला नवता की त्यांना सगळं कळत होते पण त्यांना सत्य स्वीकारायचे नवते. मला काही कळत नवते मी खोटेच म्हणालो, बाबा तुमच्या मुलाचे विमान आता गेलेही असेल कारण आता रात्र व्हायला लागली आहे.

मी खिशात हात घालून त्यांना तिकीटासाठी पैसे द्यायला गेलो तर त्यांनी साफ नकार दिला. आणि हातातला डब्बा माझ्या हाती दिला. मी विचारले, बाबा काय आहे हे ?. तेव्हा तो स्वाभिमानी म्हातारा म्हणाला, लेकरा म्हातारीने रातभर जागून बेसनाचे लाडू केले होते. असाच डब्बा घेऊन गेलो तर शेवटपर्यंत हुरहुर लागेल तिला. मला मघाशी बाप समजून खाऊ घातलस याला नाही म्हणू नकोस.

माझे डोळे पाणावले होते, मी खिशातून काही पैसे काढून जबरदस्तीने त्यांच्या सदर्‍यात कोंबले आणि पानावल्या डोळ्यांनी मुकेशच्या गाडीत बसलो. नजरेआड जाऊपर्यन्त मी साईड मिरर मधून बाबांना पाहत होतो. मी बाबांनी दिलेला डबा उघडला तेव्हा एखाद्या धारदार सुर्‍याने काळीज चिरून काढावे अशी माझी अवस्था झाली होती.

इतका मोठा डबा लाडवांनी भरलेला होता, ‘आपल्याकडे वडापावची भीक मागणारा तो स्वाभिमानी माणूस इतका भुकेला झाला होता… तरीही आपल्या मुलासाठी आणलेल्या लाडूमधला एकही लाडू त्याला का खावासा वाटला नसेल ?? मित्रांनो आजही मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीये… तुमच्याकडे असेल तर नक्की सांगा.

या एका प्रसंगाने मला माझा बाप मिळाला, सॉरी माझा बाप तिथेच होता पण या एका प्रसंगाने त्यांचा मेलेला मुलगा कदाचित परत मिळाला. कंधारच्या बाबांच्या त्या लाडूची किम्मत कधीही चुकवू शकणार नाही, जीवंतपनी तर नाहीच नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *